चंद्रपूर : प्रतिनिधी
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकार आगामी निवडणुक डोळ्यांसमोर ठेवून हे कायदे मागे घेतले आहेत, अशी टीका होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये भाजपाचे उमेदवार गावात गेल्यावर शेतकरी त्यांना जाब विचारतील, हे लक्षात आल्यानंतर भाजपाने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे त्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, अशी टीका केली आहे.
विदर्भ दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले, देशातील इतिहासात जवळपास एक वर्षापासून शेतकरी ऊन, वारा,पाऊस याची तमा न बाळगता या दिल्लीच्या सीमेवर आपली लावून मागणी लावून धरली.एका वर्षाच्या काळामध्ये केंद्र सरकारने चर्चा करून यावर मार्ग काढण्याची गरज होती. तिन्ही कृषी कायदे रद्द करायला हवे होते. मात्र सरकारने हे मान्य केलं नाही.
आता पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. निवडणुकांमध्ये भाजपाचे प्रतिनिधी गावात गेल्यानंतर शेतकरी त्यांना जाब विचारतील हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे भाजप सरकारने कृषी कायदे रद्द केले आहेत. उशिरा का होईना त्यांना हे शहाणपण सुचलं हे चांगलेच झाले आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. वर्षभर हे कायदे रद्द व्हावे म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मी सलाम करतो, अशा शब्दात त्यांनी आंदोलकांचे अभिनंदन केले.
हे तीन कृषी कायदे संसदेत अक्षरशः केवळ दोन ते तीन तासांतच परित केले आहेत. यावर कुणाचेच ऐकले गेलं नाही. आम्ही त्यावेळी सांगत होतो की, कृषी हा देशाचा आत्मा आहे. या कायद्यांविषयी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सखोल चर्चा करायला हवी होती, अशी आमची ठाम भूमिका होती. हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या समस्या निर्माण करतील, अशी आम्हाला शंका होती. मात्र सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. लगेच हे कायदे मंजूर करून टाकले, असेही शरद पवार यांनी यावेळी नमूद केले.