Site icon Aapli Baramati News

मुंबईनंतर पुण्यातही शाळा राहणार बंद; कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पाठोपाठ आज पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील शाळाही ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कोरोना आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रसाराचा वेग जास्त असल्यामुळे राज्य शासनाकडून विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पुण्यातही रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथेही या स्वरूपाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. मात्र अनेक ठिकाणी लसीकरणाला प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे नागरिकांनी लसीकरणाबद्दल कोणतेही गैरसमज बाळगू नये असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. शाळा बंद ठेवल्यानंतर ऑनलाईन वर्ग सुरूच राहणार असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुणे शहरात सध्या रुग्णसंख्या १८ टक्के इतकी झाली असून नागरिकांनी अधिकची दक्षता घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेऊन कोरोना नियमावलीचे पालन करावं असेही आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version