मुंबई : प्रतिनिधी
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना व्हाट्सअप मेसेज करून आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी देणाऱ्याला मुंबईच्या सायबर क्राईम शाखेने बंगळुरू येथून अटक केली आहे. धमकी देणारा हा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचा मोठा चाहता असल्याची माहिती पुढे येत आहे.
जयसिंग राजपूत (वय ३४) याला या प्रकरणी बंगळूरुतून अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, जयसिंग राजपूत याने दि. ८ डिसेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास आदित्य ठाकरे यांना व्हाट्सअप मेसेज केले होते. त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबाबत आरोप केले होते. तसेच आदित्य ठाकरे यांना दूरध्वनीवरून तीनवेळा कॉल केले. परंतु आदित्य ठाकरे यांनी ते कॉल घेतले नाहीत. त्यानंतर आरोपीने थेट जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
याप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुंबईच्या पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केल्यानंतर जयसिंग राजपूत हा बंगळुरू येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी बंगळूर येथे जाऊन त्याला अटक केली आहे.