
पंढरपूर : प्रतिनिधी
पंढरपूरचे भाजप नेते कल्याणराव काळे यांनी आज भाजपला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अजितदादांचे भाषण सुरू असताना त्यांना मास्क काढून भाषण करण्याबाबत चिठ्ठी आली. त्यावर मी जनतेला सांगतो मास्क वापरा आणि हा शहाणा सांगतो मास्क काढा अशा शब्दांत अजितदादांनी संबंधित कार्यकर्त्याला चिमटा काढला.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीने दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भागीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या प्रवेशाच्या कार्यक्रमात अजितदादांनी भागीरथ भालके यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.
भाषण सुरू असतानाच एका कार्यकर्त्याने अजित पवार यांना मास्क काढून भाषण करण्याबाबत चिठ्ठी पाठवली. त्यावर अजितदादांनी आपल्या खुमासदार शैलीत संबंधित कार्यकर्त्याला कानपिचक्या दिल्या. इथं आम्ही सर्वांना सांगतोय मास्क वापरा आणि हा शहाणा सांगतोय मास्क काढा.. याला काय जातंय सांगायला असं म्हणत अजितदादांनी मास्कच्या विषयांवरून चिमटा काढला.