पूरस्थिती नियंत्रण व बचावकार्यासाठी विरोधी पक्षांकडून आपत्कालिन यंत्रणांना सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सर्वदूर होत असलेला मुसळधार पाऊस तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज कोकण, नाशिक, नागपूरच्या विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन तेथील पूरस्थितीचा व आपत्कालिन परिस्थितीतील बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.
राज्यात सुरु असलेली अतिवृष्टी व पूरस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य आपत्कालिन यंत्रणा व जिल्हा प्रशासनाला विरोधी पक्षांचे स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांकडून संपूर्ण सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी विभागीय आयुक्तांना दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी आपत्कालिन परिस्थितीत रस्त्यावर उतरुन नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, असे निर्देशही अजित पवार यांनी विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना यावेळी दिले आहेत.