मुंबई : प्रतिनिधी
धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकाल्पामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मोठा घोटाळा केल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पुनर्वसन प्रकल्पासाठी तत्कालीन सरकारने ४५ एकर जमिन खरेदी केली. यासाठी सरकारने रेल्वेला ८०० कोटी रुपये दिले. मात्र राज्य सरकारला अद्यापपर्यंत जमीन मिळालेली नाही. तसेच रेल्वेला दिलेले ८०० कोटी रुपये परत मिळाले नाहीत. ही जनतेच्या पैशाची लूट आहे. या घोटाळ्याची चौकशी एसआयटी मार्फत करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले यांनी टिळक भवन येथे रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले, दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या काळातच धारावीचा कायापालट व्हावा, तेथील लोकांना घरे मिळावी, स्वच्छ आणि सुंदर मुंबई व्हावी यासाठी पुनर्वसन प्रकल्पाची योजना मांडण्यात आली होती. मात्र काही कारणांमुळे ती योजना कार्यान्वित झाली नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात धारावी पुनर्वसन प्रकल्पाची योजना कार्यान्वित झाली. तत्कालीन सरकारने या योजनेच्या जमीन खरेदीसाठी रेल्वेला ८०० कोटी रुपये दिले. मात्र जमीन ही मिळाली नाही आणि रेल्वेला दिलेले पैसेही परत मिळालेले नाही. मग या योजनेचे पुढे काय झाले? योजना का फसली? असे प्रश्न उपस्थित करत नाना पटोले यांनी या घोटाळ्याची चौकशी एसआयटीमार्फत व्हावी, ईडी व सीबीआय चौकशीसाठी शिफारस करावी,अशी
मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. तसेच हा विषय विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.