Site icon Aapli Baramati News

महाविकास आघाडी सरकारमधील ५० ते ६० आमदार नाराज : चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

ह्याचा प्रसार करा

शिर्डी : प्रतिनिधी

गेल्या दहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षांची निवड मंगळवारी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी करण्यात येणार होती. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणूक पद्धतीवर आक्षेप घेतल्याने निवडणूक होऊ शकली नाही. अशातच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारचे ५० ते ६०आमदार नाराज असल्याचा दावा करत या नाराजीमुळेच महाविकास आघाडी सरकार आवाजी पद्धतीने अध्यक्षपदाची निवडणूक घेत असल्याचा आरोप केला आहे.

शिर्डीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील ५० ते ६० आमदार नाराज आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धतीत बदल करून आवाजी पद्धतीने निवडणूक घेण्याचा घाट घातला होता. अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्याचा कायदा असताना सरकारला आवाजी पद्धतीने निवडणूक घेण्याची गरज का भासली, असा सवाल उपस्थित केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री १६-१६ महिने भेटत नसतील, काम करत नसतील तर काय होणार असा टोला लगावत चंद्रशेखर बावनकुळे यांनी जर महाविकास आघाडी सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही आवाजी पद्धतीने न घेता गुप्त मतदान पद्धतीनेच घ्यावी, असे आव्हान दिले आहे.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version