पुणे : प्रतिनिधी
१२ आमदारांच्या नियुक्तीबाबत सरकार आग्रह करत नाही, तुम्ही का करता असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला होता. आता त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. पुढील आठवड्यात १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आपण भेटणार आहोत, अशी माहिती अजितदादांनी दिली आहे.
आज पुण्यात झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी राज्यपालांच्या विधानाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर बोलताना अजित पवार यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत राज्यपालांना भेटण्यासाठी जाणार असल्याची माहिती दिली.
गुरुवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान राज्यपालांची भेट झाली. त्यावेळी १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत ओझरती चर्चा झाली आहे. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आपण राज्यपालांची भेट घेऊन १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत चर्चा करणार असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल आणि सरकारमध्ये संघर्ष पाहायला मिळाला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत राज्यपालांना भेटणार आहेत. या भेटीनंतर १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रलंबित विषय मार्गी लागतो का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.