Site icon Aapli Baramati News

..ही वेळ राजकारणाची नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक साद

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील बससेवा विस्कळीत झाली असून सामान्य प्रवाशांना याचा त्रास सोसावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक साद घातली आहे.  तुमच्या समस्यांवर तोडगा निघेल, पण सद्यस्थितीत राजकारण न करता शासनाला सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात,  एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे.   

अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा  मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.

राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version