
मुंबई : प्रतिनिधी
मनसे कार्यकर्त्यांकडून घाटकोपरमध्ये पोस्टरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ‘हिंदुहृदसम्राट’ असा उल्लेख करण्यात आला होता. या पोस्टरबाजीवरून मनसेने कार्यकर्त्यांना खडसावले आहे. राज ठाकरे यांना हिंदुहृदसम्राट नाही तर मराठी हृदयसम्राट म्हणा, असा आदेश मनसेने दिला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनतेने उत्स्फूर्तपणे ‘हिंदुहृदयसम्राट’ ही पदवी बहाल केली होती. बाळासाहेब सोडून इतर कोणत्याही नेत्याच्या नावापुढे आजपर्यंत हिंदुहृदसम्राट अशी उपाधी लावण्यात आली नाही. मात्र दोन दिवसांपूर्वी घाटकोपरमधील मनसे कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मनसैनिकाकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली होती. त्या पोस्टरवर राज ठाकरे यांना हिंदुहृदसम्राट अशी उपाधी दिली होती.
त्या पोस्टरवर स्वतःला दिलेली हिंदुहृदसम्राट अशी उपाधी राज ठाकरे यांना आवडली नाही. त्यामुळे त्यांनीही यापुढे नावापुढे हिंदुहृयसम्राट अशी उपाधी देऊ नका अशी तंबी कार्यकर्त्यांना दिली आहे. याआधीही मनसैनिकांकडून हिंदुहृदसम्राट अशी उपाधी त्यांना दिली होती. त्यावेळी राज ठाकरे त्यांच्यावर खडसावले होते.
राज ठाकरे यांना दिलेल्या उपाधीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसेकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या हृदयात सर्वोच्च स्थान असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव सध्या प्रचलित असलेल्या उपाधी व्यतिरिक्त इतर नवीन कोणतीही उपाधी लावण्याचा उद्योग करू नये आणि या सूचनांचे तंतोतंत पालन व्हावे, अशी सूचना मनसे कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे.