पुणे : प्रतिनिधी
मुळशी तालुक्यातील हिंजवडी माण आणि मारुंजी परिसरातील रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करा, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील सुविधांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ,पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, औद्योगिक वसाहत परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुस आणि वाकड रस्त्यांचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावे. म्हाळुंगे मार्गे हिंजवडी रस्त्याच्या कामाचेही नियोजन करावे. एमआयडीसीने कचरा प्रकल्पासाठी त्वरित कार्यवाही करावी. माण, मारुंजी येथे पोलीस चौकीस मान्यता देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत निवासी परिसर रस्त्यावरील सीसीटीव्ही, उद्यान, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, एसटीपी प्रकल्प, पाणी पुरवठा योजना, खेळाचे मैदान, अग्निशमन केंद्र आदींबाबत चर्चा करण्यात आली.जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी औद्योगिक परिसरातील समस्या त्वरित सोडवाव्यात. नागरिकांना नव्या सुविधांमुळे दीर्घकालीन लाभ होईल असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आदी विभागाचे प्रमुख अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
मुळशी तालुक्यातील हिंजवडी माण आणि मारुंजी परिसरातील रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करा, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.