
पुणे : प्रतिनिधी
केंद्र सरकारकडून घेण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा २०२१’ या स्पर्धेत पुणे शहराने देशात पाचवे स्थान मिळवले आहे. गेल्यावर्षी पुणे शहर या स्पर्धेत सतराव्या स्थानी राहिले होते. मात्र यावर्षी पुणे शहराने स्वच्छतेबाबत अधिक सुधारणा करत पाचवे स्थान मिळवले आहे. आज दिल्लीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पुणे महानगरपालिकेचा सन्मान करण्यात आला.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, सर्वेक्षण विभागाच्या उपायुक्त आशा राऊत, घनकचरा विभागाचे प्रमुख अजित देशमुख, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाडगे यांनी हा सन्मान स्वीकारला. केंद्र सरकारकडून घेण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा २०२१’ ही स्पर्धा घेण्यात आली.
दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या एकूण ४८ शहरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामध्ये इंदौर शहराने सलग दुसऱ्या वर्षी पहिला क्रमांक मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर सुरत, तिसऱ्या क्रमांकावर विजयवाडा, चौथ्या क्रमांकावर नवी मुंबई, तर पाचवा क्रमांक पुणे शहराने पटकावला आहे.
महानगरपालिकेने गेल्या वर्षी शहर स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही पुणे शहर सतराव्या स्थानावर होते. यावर्षी कोरोना काळामध्ये करण्यात आलेले काम, कचऱ्याचे व्यवस्थापन, नदी स्वच्छता, शहरातील रस्ते, पादचारी रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच नागरिकांचा स्वच्छता मोहिमेत वाढलेला सहभाग आणि इतर घटकावर चांगल्या पद्धतीने सुनियोजित काम करण्यात आले. त्यामुळे यावर्षी शहर स्वच्छ ठेवण्यात कामगीरी उंचावल्याने देशात पाचवे स्थान मिळाले आहे.