
पुणे : प्रतिनिधी
गेल्या शनिवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाली होती. त्याच पायऱ्यांवर आज भाजपने त्यांचा सत्कार केला आहे. त्यानंतर किरीट सोमय्यांच्या सत्कारानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्कार केलेल्या पायऱ्यांवर गोमुत्र आणि गुलाब पाणी ओतून निषेध व्यक्त केला आहे.
कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना महत्वाच्या कामांसाठी महापालिकेत प्रवेश दिला जात आहे. ज्या पायऱ्यांवर सोमय्या यांना धक्काबुक्की झाली त्या ठिकाणी भाजपने आज त्यांचा सत्कार घेण्याचा ठरवले. मात्र पोलिसांनी भाजपला किरीट सोमय्या यांचा सत्कार करण्यासाठी परवानगी दिली नव्हती. तरीदेखील बंधने झुगारून किरीट सोमय्या पुन्हा एकदा पुण्यामध्ये सत्कारासाठी आले होते. त्यांच्या येण्यामुळे महानगरपालिकेत गदारोळ झाला.
सोमय्या पुणेकरांच्या प्रश्नासाठी कधी धावून आले नाहीत. मात्र फक्त कांगावा करायला येतात. त्यामुळे त्यांचा आम्ही निषेध करत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर आम आदमी पक्षानेही पालिकेसमोर आंदोलन केले. सोमय्या सत्कारासाठी पुण्यात येणार होते. मात्र कोणालाही महानगरपालिकेत प्रवेश दिला नाही. गिरीश बापट हे दीडशे लोक आत घेऊन जातात, ते कसे चालते असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.