
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा आज ‘श्रीमन साधू मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार’ देवून गौरव करण्यात आला. गेली अनेक वर्ष सामाजीक, शैक्षणिक आणि पर्यावरण क्षेत्रातील कामांबद्दल हा सन्मान करण्यात आला.
चिंचवड येथील मोरया गोसावी समाधी मंदिर परिसरात शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडेकर, माजी महापौर अपर्णा डोके, मंगला कदम यांच्यासह चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सुनेत्रा पवार यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासह वंचित घटकांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
चिंचवड देवस्थान ट्रस्टने दिलेला हा पुरस्कार म्हणजे संपूर्ण सहकाऱ्यांचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करुन सुनेत्रा पवार यांनी येणाऱ्या काळातही समाजसेवेचा वसा अखंडपणे सुरु राहील अशी ग्वाही दिली. यावेळी त्यांनी विविध सामाजिक कार्याबद्दल माहिती देत यापुढेही विविध क्षेत्रात काम करुन वंचित घटकांना आधार देण्याचा प्रयत्न राहील असेही त्यांनी नमूद केले.