Site icon Aapli Baramati News

सरकार पडणार म्हणणारे देव पाण्यात घेऊन बसलेत : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा टोला

ह्याचा प्रसार करा

नाशिक : प्रतिनिधी

विरोधी पक्षांकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकार पाडणार असल्याची विधाने केली जात आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शैलीमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रोज कोणीही बोलतात, सरकार जाणार आहे. सरकार पडणार म्हणणारे आपला देव पाण्यात घेऊन बसले आहेत अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला आहे.

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात नाकोडे येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानुसार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार काम करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने राज्याचा कारभार सुरू आहे. मात्र विरोधक रोजच सरकार पडणार असल्याचे सांगतात. सरकार पडणार असं म्हणणारे  देव पाण्यात घेऊन बसले आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

सप्तश्रृंगी देवीच्या गडाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून २२ कोटी ५० लाख रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आल्याची माहिती देऊन अजित पवार यांनी जिल्ह्यात कोणत्याच विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही दिली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version