मुंबई : प्रतिनिधी
आपले सरकार कधी येणार… देवेंद्रजी, माझ्या कानात सांगा.. आम्ही कोणाला सांगत नाही. या सरकार येण्याच्या चर्चा आता बंद करा. आपण सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने जून महिन्यापासूनच कामाला सुरुवात केली आहे अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सुनावले आहे. दस्तुरखुद्द प्रदेशाध्यक्षांनीच या विषयावर भाष्य केल्यामुळे भाजपची सरकार पाडण्याची मोहीम थंडावली का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दादर येथील वसंत स्मृती कार्यालयामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी सरकार कधी येणार यापेक्षा आपल्याला सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याकडे लक्ष द्यायचे असल्याचे सांगितले.
राज्यातील प्रखर आणि भक्कम विरोधी पक्ष म्हणून काम करायचे आहे. त्यासाठी आपण जून महिन्यापासूनच कामाला लागलो आहोत. आपले सरकार कधी येणार, माझ्या कानात सांगा. या सगळ्या चर्चा आता बंद करा. भक्कम विरोधी पक्ष म्हणून कामाला लागा, असा सल्लाच त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
आपण चांगल्या प्रकारे शास्त्रीय कार्यक्रम ठरवलेला आहे. मोदींच्या राजकीय जीवनाला २० वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने तुम्हाला वेगवेगळे कार्यक्रम दिलेले आहेत, ते राबवा, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
दरम्यान, भाजप नेत्यांकडून वारंवार हे सरकार लवकरच पडणार आहे. हे सरकार त्यांच्या कर्माने पडेल असे सांगण्यात येत होते. मात्र चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला भक्कम विरोधी पक्ष म्हणून काम करायचे असून सरकार पाडण्याच्या चर्चा बंद करा, असे पदाधिकाऱ्यांना सांगितल्यामुळे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कार्यक्रम भाजपने बासनात गुंडाळला की काय असा सवाल उपस्थित होत आहे.