मुंबई : प्रतिनिधी
कर्नाटकमधील हिजाब प्रकरण चांगलेच तापले आहे. ठिकठिकाणी या प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन केले जात आहे. या वादावर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. समाजात फूट पाडणाऱ्या घटना टाळायला पाहिजेत. कारण त्याचा काही लोक राजकीय उद्देशाने फायदा घेण्याचा प्रयत्न करत असून ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जात आणि धर्मात फूट पाडायला आपली भारतीय संस्कृती आणि संविधान शिकवत नाही, असे ते म्हणाले,
आज जग पुढे जात आहे. देश प्रगत होत आहे. आपल्या देशात तरुणांची एवढी मोठी फळी आहे.अशावेळी या तरुणांचा वापर करून विकासासाठी वापर करता येईल, याचा विचार केला पाहिजे असेही अजित पवार यांनी नमूद केले. अशावेळी एखादी व्हिडिओ क्लिप वायरल केली जाते. मग त्यावर कोणीतरी ट्विट करते. त्यावर काऊंटर ट्विट पडतात आणि मग त्यातून निष्कारण नको त्या विषयाला महत्त्व दिले जाते. याबाबत सगळ्यांनी संयमी भूमिका ठेवून वागले पाहिजे, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.