अहमदनगर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विरोधी पक्षातील केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केले आहे. सत्तेचा वापर विकासाच्या कामांसाठी कसा करावा हे, नितीन गडकरी यांच्याकडून शिकावं अशा शब्दांत शरद पवार यांनी कौतुक केले आहे.
गरमध्ये महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी शरद पवार बोलत होते. नितीन गडकरी यांच्या हस्ते जिल्ह्यातील २५ महामार्गांचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गडकरी आणि पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
अनेक वेळा विकास कामांचे भूमिपूजन होऊन ते काम तसेच ठप्प पडले असते. मात्र जेव्हा नितीन गडकरी यांच्या हातात एखादा प्रकल्प असतो. त्यावेळी थोड्याच कालावधीत त्या प्रकल्पाचे काम सुरू झालेले पाहायला मिळते. नितीन गडकरी यांनी या मंत्रालयाची धुरा सांभाळण्याची अगोदर देशात जवळपास ५ हजार किलोमीटर रस्त्याची कामे झाली होती. मात्र गडकरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर देशातील १२ हजार किलोमीटर रस्त्याची कामे झालेली आहेत. लोकप्रतिनिधीने देशाच्या विकासासाठी काम करायला हवे याचे उत्तम उदाहरण नितीन गडकरी आहेत, असे शरद पवार यांनी नमूद केले.
देशाच्या कोणत्याही भागात गेल्यानंतर; तेथे उत्तम रस्ते पाहायला मिळतात. प्रत्येक राज्यात उत्तम रस्ते पाहण्यास मिळत असल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, लोकप्रतिनिधी, मंत्री, अधिकारी यांच्याकडे या रस्त्यांचा विषय काढला तर ते गडकरी यांचे नाव सांगतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी सत्तेचा वापर देशाच्या विकासासाठी कसा करायला हवा याचे उत्तम उदाहरण गडकरींनी करून दाखवला आहे.