मुंबई : प्रतिनिधी
साकीनाका प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्र लिहीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विधिमंडळाचे दोन अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी या पत्राला प्रत्युत्तर देत एक पत्र लिहिले आहे. या पत्रात मुख्यमंत्र्यांनी संसदेच्या चार दिवसांच्या अधिवेशनाची मागणी करत; दिल्ली, गुजरात, उत्तरप्रदेश व बिहारची अत्याचार परिस्थिती दाखवत केंद्र सरकारवर टीका केली आहे.
साकीनाकामध्ये घडलेल्या घटनेबद्दल महिलांच्या सुरक्षिततेबाबत तुम्ही राज्यपाल या नात्याने चिंता व्यक्त करत आहात. या घटनेबद्दल आम्हालाही चिंता आहे. हा विषय फक्त साकीनाकाबद्दल मर्यादित नसून, तो राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे या राष्ट्रव्यापी अत्याचारांना थांबवण्यासाठी आपण संसदेचे चार दिवसाचे अधिवेशन बोलण्याची मागणी करणारे पत्र माननीय प्रधानमंत्री व गृहमंत्री यांना द्यावे. मग या अधिवेशनातच साकीनाकाबद्दल ही चर्चा करता येईल, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
त्यासोबत ठाकरेंनी या पत्रात, गुजरात आणि त्यासोबत इतर राज्यातील अत्याचारांबाबत ही उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटले की, शेजारील गुजरात राज्यात पोलीस रिपोर्टनुसार, गुजरातमध्ये दररोज १४ बलात्कार होतात. दिल्लीमध्ये मागच्या महिन्यात नऊ वर्षे बालिकेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. बिहारमध्ये एका खासदाराने त्यांच्या महिला कार्यकर्त्यावर बलात्कार केला. उत्तरप्रदेश मधील उन्नाव , हाथसर यांसारख्या अनेक अत्याचारांच्या प्रकरणांची माहिती त्यांनी दिली.