नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमध्ये सुरु असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यात आली. रीनाईसन्स स्टेट या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरत लेखन केल्याच्या आरोपातून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकत निषेध नोंदवला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी गिरीश कुबेर हे एका परिसंवादात सहभागी होण्यासाठी नाशिकमध्ये आले होते. या दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गिरीश कुबेर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या अंगावर शाई फेकली.
या घटनेनंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त होत असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार संजय राऊत यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.