
मुंबई : प्रतिनिधी
नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत राज्य सरकारने किराणा दुकानांमध्ये वाईन विकण्यास परवानगी दिली आहे. यानंतर भाजपाकडून राज्य सरकारवर कडाडून टीका केली जात आहे. अशातच, संजय राऊत यांची वाईन व्यवसायामध्ये मोठी गुंतवणूक आहे. अशोक गर्ग या व्यावसायिकासोबत त्यांनी भागीदारी केली आहे. त्यामुळेच ते राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत आहेत असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यांच्यावर केला आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, अशोक गर्ग हे २०१० पासून दोन कंपन्या चालवतात. त्यापैकी एक कंपनी वाईन वितरणाचा व्यवसाय करते. संजय राऊत यांनी १६ एप्रिल २०२१ रोजी अशोक गर्ग यांच्यासोबत भागीदारी केली. त्यानंतर अशोक गर्ग यांनी १२ जानेवारी २०२२ रोजी आपल्या कंपनीचे आणि व्यवसायाचे नाव बदलत असल्याची माहिती कंपनी मंत्रालयाला दिली होती. पूर्वी त्यांच्या कंपनीचे नाव मादक होते. त्यानंतर ते नाव बदलून मॅक पी असे ठेवण्यात आले असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी अशोक गर्ग यांच्याशी भागीदारी केली. त्यांच्या कन्या पूर्वशी आणि विधिता या दोघीही या कंपन्यांमध्ये भागीदार आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी आपले हितसंबंधांची माहिती जाहीर करायला हवी होती, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.