
मुंबई : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवर शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपचे संबध का बिघडले? यावर शिवसेना नेते खा. संजय राऊतांनी भाष्य केले . संजय राऊत यांनी भाजपाचा समाचार घेत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे शिवसेनेत येणार होते.मात्र बाळासाहेबांच्या सांगण्यावरून गोपीनाथ मुंडे भाजपात राहिले होते,असा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून संजय राऊत यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, शिवसेना आणि भाजपाचे संबंध कोणामुळे बिघडले. यावर एकदा प्रकाश टाकायला हवा. आज प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे असते तर, शिवसेना आणि भाजपचे संबंध इतके विकोपाला गेले नसते.
पक्षात असंतोष आणि घुसमट होत असल्यामुळे गोपीनाथ मुंडे पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. त्यांनी दिल्लीत जाऊन नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. गोपीनाथ मुंडे शिवसेनेत येण्याच्या तयारीत होते.
त्यावेळी बाळासाहेबांनी गोपीनाथ मुंडे यांना बाळा तू शिवसेनेत येऊ नको. दिवस बदलत असतात. तू लढत रहा असा सल्ला दिला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी दिलेला सल्ला गोपीनाथ मुंडे यांनी ऐकला, असे संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात नमूद केले आहे.