दौंड : प्रतिनिधी
ग्रामीण भागामध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा येत नाही, तोपर्यंत तेथील व्यापारपेठ गती घेऊन शकत, हे त्रिकाल बाधित सत्य असल्याचे मत आमदार ॲड. राहुल कुल यांनी व्यक्त केले.
दौंड येथे भारतीय जनता पार्टी व्यापार आघाडी पुणे जिल्ह्याच्या कार्यकारिणीची पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. भाजपा जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, संघटन सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, रोहिदास उंद्रे पाटील, भाजपा जिल्हा सदस्य, सुनिल शर्मा भाजपा, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य मोहनलाल भंडारी, भाजपा तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, दौंड शहराध्यक्ष फिरोज खान, भाजपाचे शहर उपाध्यक्ष राहुल भंडारी, फारूख शेख, शहर सरचिटणीस नासिर पटेल, भाजपा शहर युवाध्यक्ष प्रकाश परदासानी, कुसेगावचे सरपंच मनोज फडतरे, विश्वजीत सोनवणे, सनी सोनार व तालुका व जिल्हातून आलेले भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना कुल म्हणाले की, सध्या दौंडची बाजारपेठ वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे भीमा नदीवरील 20 कोटी रुपयांचा दौंड-गार पुल मंजूर करून आणला असून; तो येत्या एक-दोन वर्षात पूर्णत्वास येणार आहे. या पुलामुळे दौंडच्या शेजारील गाव जोडली जाऊन दौंडची बाजारपेठ भरभराटीला येणं शक्य आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचेही प्रश्न सुटणार आहेत.
पक्षामार्फत आणि पक्षाच्या प्रतिनिधीमार्फत केली जाणारी विकासकामे, पक्षाच्या येणाऱ्या भूमिका ही जनतेपर्यंत पोहोचविण्याचे, जनतेशी संवाद ठेवणे, त्यांच्या भावना जाणण्याचे काम हे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले पाहिजे, तसेच लोकप्रतिनिधी या नात्याने व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असून शासनाशी पत्रव्यवहार करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आमदार कुल सांगितले.
भाजपा व्यापार आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष स्वप्निल शहा यांनी केंद्र सरकारकडून जाहीर होणाऱ्या नवीन योजना या व्यापाऱ्यांसाठी राबविण्याचे काम या व्यापार आघाडीमार्फत केले जाईल असे सांगितले.