Site icon Aapli Baramati News

शिवाजी पार्कवर कॉंग्रेसचा वर्धापनदिन; राहुल गांधींच्या सभेसाठी काँग्रेसची उच्च न्यायालयात धाव

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त २८ डिसेंबरला मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सभेसाठी परवानगी द्यावी या मागणीसाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.

यावर्षी काँग्रेसचा वर्धापन दिन मुंबई येथील शिवाजी पार्क येथे होणार आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी या वर्धापन दिनानिमित्त संबोधित करणार आहेत. याकरिता शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी ऑक्‍टोबर महिन्यातच राज्य शासनाकडे परवानगी मागण्यात आली आहे. परंतु अद्याप त्या अर्जावर राज्य सरकारचा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने सभा घेण्यासाठी परवानगी द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.

कॉँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी राज्य सरकारकडे विनंती अर्ज करून २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर पर्यंत मैदान वापरण्यास परवानगी द्यावी. त्यासोबतच मैदानावर तात्पुरते व्यासपीठ बांधण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे.  कोरोना संबंधीचे सर्व नियम पाळत ही सभा घेण्यात येईल, असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालय या सभेसाठी परवानगी देणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version