मुंबई : प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून माहाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षात गंभीर आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे . त्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवसेनेने दसरा मेळाव्यापूर्वी भाजपसोबत यावे’, असे आवाहन त्यांनी केले आहे. शिवसेनेचे राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहणे नुकसानीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
माहाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षात त्यांचे अंतर्गत वाद आहेत. त्यामुळे एकमेकांवर आरोप करत आहेत. सेनेने राष्ट्रवादीची साथ सोडून अडीच – अडीच वर्षाचा फार्मूला स्वीकारत भाजपा सोबत यावे. जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर केंद्राकडून निधी आणण्यास सोपे होईल. त्यामुळे ऑक्टोबर मधील दसरा मेळावा पूर्वी सेनेने भाजपासोबत यावे असे , आठवले म्हणाले.
माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावरही आठवलेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, शरद पवार हे सन्माननीय नेते असून; ते महाराष्ट्राचे नेते आहेत. सेनेला जर पवार यांच्यावर गंभीर आरोप करायचे असतील तर, त्यांनी राष्ट्रवादीसोबत राहूच नये. सेनेने भाजप आरपीआय सोबत येऊन; बाळासाहेब ठाकरे यांचे भीमशक्ती आणि शिवशक्ती मिलनाचे स्वप्न पूर्ण करू, अशा भावना देखील आठवले यांनी यावेळी व्यक्त केल्या.