
मुंबई : प्रतिनिधी
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे काल निधन झाले. त्यांच्यावर काल सायंकाळी शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अभिनेता शाहरुख खानने लतादीदींच्या अंत्यदर्शन घेताना दुवा पठन करत फुंकर मारली. यावरून समाजमाध्यमांवर शाहरुखला ट्रोल करण्यात येत आहे. शाहरुखला ट्रोल केलं जात असल्याने शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी शाहरुख खानला ट्रोल करणे हा निव्वळ नालायक आणि बेशरमपणा असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या लोकांना थोडीफारसुद्धा लाज नाही. अशा वेळीही हे लोक राजकारण करत आहेत. शाहरुख हा दुवा मागत होता. शाहरुखला टोल करणे हे अत्यंत चुकीचे आहे. त्याला ट्रोल करणे नालायकपणा आणि बेशरमपणा आहे. एका गटातील आणि एका परिवारात लोक ट्रोल करत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. धर्म, जात, पंथ, द्वेष यापलीकडे तुम्हाला काही सुचत नाही का? तुम्ही देशाचे वाट लावून टाकली आहे, अशा तीव्र शब्दात संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, लतादीदींच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंत्यसंस्कार झाले. सगळ्या क्षेत्रातील मान्यवर अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. यावेळी लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी अभिनेता शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा दादलानी उपस्थित होते. यावेळी शाहरुख खानने मुस्लिम परंपरेनुसार दुवा मागण्यासाठी दोन्ही हात वर केले. त्यानंतर लतादीदींच्या पायांना स्पर्श करत अभिवादन केलं. त्यानंतर दुवा पठण केल्यानंतर मास्क काढून परंपरेनुसार फुंकर मारली. मात्र यानंतर हा व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. शाहरुख खान थुंकल्याचे मेसेज सर्वत्र व्हायरल झाले. यावरूनच शाहरुखला ट्रोल केले जात आहे.