पुणे : प्रतिनिधी
एकीकडे कोरोनाने लाट ओसरत असतानाच नवीन विषाणूने डोके वर काढले आहे. कोरोना आणि ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील शाळा सुरू करणे पुणे महानगरपालिकेने टाळले होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने पालिकेने पुन्हा एकदा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आजपासून पुण्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
पुण्यातील ग्रामीण भागातील पहिली ते चौथीची शाळा सुरू करण्यात आली होती. मात्र शहरी भागात प्राथमिक शाळा सुरू करण्याला शासनाने मान्यता दिली नव्हती. एक डिसेंबरपासुन हे वर्ग सूरू करावेत अशी सूचना शासनाकडून देण्यात आली होती. कोरोनाच्या ओमीक्रॉन या विषाणूमुळे पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गांना १५ डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली होती. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णांचे प्रमाण कमी झाले असल्याने महापालिकेने गुरुवारपासून शाळा चालु कराव्यात असे आदेश दिले आहेत.
त्यानुसार आजपासून सर्व नियमाचे पालन करत पुण्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. उपमख्यमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.