पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून दोन दिवसीय पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. आगामी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा त्यांचा दौरा असणार आहे. उद्या ते आजी-माजी नगरसेवकांची बैठक घेणार आहेत. तर रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. त्यामुळे आगामी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला पवार यांचा हा दौरा धडकी भरवणारा आहे.
आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार दोन दिवसाचा शहराचा दौरा करतील. शनिवार आणि रविवार असा दोन दिवसाचा पवार यांचा दौरा असणार आहे. उद्या शरद पवार हे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात सरकारी योजनांच्या नागरिकांना लाभ देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन करतील. त्यानंतर निगडीतील यमुनानगर येथील बॅक्वेट हॉलमध्ये आजी-माजी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. रविवारी रहाटणीतील थोपटे लॉन्स येथे दुपारी साडेतीन वाजता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत.
पवार यांच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे यांची उपस्थिती असणार आहे. आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी चालू आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपासमोर मोठे आव्हान असणार आहे.