पुणे : प्रतिनिधी
शहरात वेगवेगळी विकासात्मक कामे चालू आहेत. कामे जोमाने करा. कामे वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी कंत्राटदारांनी आणि महापालिकेने लक्ष द्यायला हवे. लोकाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार गिरीश बापट, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र शासन, राज्य शासन आणि महापालिका यांनी समन्वय ठेवत कामे वेळेत पूर्ण करायला हवीत अशी सूचना केली.
कामे आणि विकास हे गतीने व्हायला हवीत. काही ठिकाणी एकरसाठी १८ कोटी रुपये मोबदला दिले गेल्याचे उदाहरण समोर आले आहे. हे व्यवहार्य ठरत नाही. जमिनीच्या बदल्यात मोबदला द्यायचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत हा मोबदला जास्त होत आहे. त्यामुळे निश्चित केलेला दर बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मी काल मुख्यमंत्र्यांना उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत दोन कार्यक्रम असल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सोयीच्या वेळेनुसार नितीन गडकरी यांना सह्याद्री अतिथीगृहावर बोलवून घ्या, असा निरोप दिला आहे. राज्यातील रखडलेल्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी हा वेळ द्यावा असेही अजित पवार यांनी सांगितले.