मुंबई : प्रतिनिधी
अभिनेत्री कंगना राणावतने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आहिंसेवर भाष्य केले आहे. दुसरा गाल पुढे करून स्वातंत्र्य मिळत नाही, असे वादग्रस्त विधान करत तिने खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देत वेडे लोक काहीही बरळत असतात. ते का बरळत आहेत ? त्यांना बरळण्यासाठी नशेचा पुरवठा कोण करत आहे याबाबत अमली पदार्थ नियंत्रण विभागाने तपास करायला हवा, असा खोचक टोला लगावला आहे.
१९४७ ला मिळालेले स्वातंत्र्य हे भिक होते, असे वादग्रस्त विधान कंगना राणावतने केले होते. त्यानंतर पुन्हा महात्मा गांधी यांच्या अहिंसेवरुन वक्तव्य केले आहे. त्यावर संजय राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत कंगनाचा समाचार घेतला.
चीनने गालावर मारत अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्ये घुसखोरी केली. आपण त्यांच्यासमोर दुसरा गाल केला. देशात सध्या बरेच काही चालू आहे. काश्मिरात पंडित लोकांच्या हत्या होत आहेत. देशाची अवस्था बिकट होत चालली आहे. मात्र मॅडमला हे काही दिसत नाही असे सांगून संजय राऊत म्हणाले, महात्मा गांधी हे विश्वनाईक होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याला दिशा दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा राजघाटावर जाऊन त्यांच्यासमोर नतमस्तक होतात. आज संपूर्ण देश आणि जग गांधीजींच्या विचारांनी प्रभावित आहे, मॅडमला हे माहिती असायला हवे होते.
भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोण होतास तू आणि काय झालास तू .. अशी टीका केली होती. या टिकेलाही संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस खूप जुनी गाणी ऐकतात. त्यांना यासाठी भरपूर वेळ आहे. आम्ही कोण आहोत हे सर्वांना माहिती आहे. मात्र फडणवीस काय होते आणि त्यांची अवस्था काय झाली हे सगळ्यांना दिसत आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
जर तुमची झालेली ही अवस्था अशीच कायम राहिली तर तुम्हाला वेड्याच्या दवाखान्यात भरती करावी लागेल. भरती करण्याची वेळ येऊ नये यासाठी मी प्रार्थना करतो. माणूस प्रमाणाबाहेर निराश झाल्यावर अशी विधाने करतो, असेही राऊत यांनी म्हटले आहे.