मुंबई : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय समितीची घोषणा करण्यात आली आहे. या समितीत माजी मंत्री विनोद तावडे यांना ‘महामंत्री’ या महत्वपूर्ण पदावर संधी देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी परिपत्रक काढून या समितीची घोषणा केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर विनोद तावडे यांच्यावर प्रथमच मोठी जबाबदारी देऊन त्यांचे राजकीय पुनवर्सन करण्यात आले आहे.
विनोद तावडे यांनी यापूर्वी भाजपचे प्रदेश सरचिटणीस, मुंबई अध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, शिक्षणमंत्री या पदांवर काम केले आहे. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता नव्याने त्यांच्यावर राष्ट्रीय समितीच्या महामंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्यात होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी विनोद तावडे आणि चित्रा वाघ यांना पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र ऐनवेळी दोघांनाही पक्षाकडून उमेदवारीची संधी देण्यात आली नाही. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात आला आहे.