मुंबई : प्रतिनिधी
गेल्या दहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षांची निवड मंगळवारी दि. २८ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी चालू आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक आवाजी पद्धतीने होत असल्यामुळे आपण याचा अभ्यास करून निर्णय कळवू असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिष्टमंडळाला सांगितलं आहे.
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
विधानसभा अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम निश्चित करून तो जाहीर करावा, ही विनंती आम्ही राज्यपालांना केली आहे. मात्र निवडीची पद्धत बदलल्यामुळे त्याबद्दल अभ्यास करून मग निवडीचा कार्यक्रम जाहीर करू, असे राज्यपालांनी सांगितले आहे. त्यांच्याकडून आलेल्या निवडीच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार अध्यक्षांची निवड केली जाईल, असे बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.
राज्यपालांना बदललेल्या निवडणुक पद्धतीवर आणि नियमांवर अभ्यास करायचा आहे. त्यासाठी त्यांना वेळ लागणार आहे. काही तांत्रिक बाबींची माहिती घ्यायची आहे. त्यामुळे ते उद्यापर्यंत निवडणूक कार्यक्रम पत्रिकेवर सही करून; कार्यक्रमाला मान्यता देतील अशी अपेक्षा असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. भाजपच्या निलंबित आमदारांबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.