पुणे : प्रतिनिधी
नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा प्रश्न येत्या पावसाळी अधिवेशनात मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. याबाबत कॉँग्रेस नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संकेत दिले असून विधानसभा अध्यक्षपदी भोरचे कॉँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मंत्रीपदाने हुलकावणी दिल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदासाठी थोपटे यांचे नाव आघाडीवर आहे.
कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारण्यापूर्वी नाना पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. नाना पटोले यांनी ४ फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हंगामी अध्यक्ष म्हणून नामदेव झिरवाळ यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्याच अधिपत्याखाली विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले होते. त्यानंतर भाजपकडून विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही याबाबत सरकारला स्मरण करून दिले होते.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संकेत दिले असून येत्या पावसाळी अधिवेशनातच ही निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदी कॉँग्रेसचाच आमदार विराजमान होईल, त्याची निवडही लवकरच होणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
विधानसभा अध्यक्षपदासाठी पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघातील कॉँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांचे नाव चर्चेत आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळात त्यांचा समावेश होईल अशी शक्यता होती. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. त्यातूनच त्यांच्या समर्थकांनी पुण्यातील कॉँग्रेस भवनाची मोडतोड करत संताप व्यक्त केला होता. आता पुन्हा संग्राम थोपटे यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदाच्या चर्चेत आघाडीवर आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.