मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. भाजपाच्या संजय केनेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सातव यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सातव यांच्या बिनविरोध निवडीमुळे हिंगोली जिल्ह्यात कॉँग्रेसला पुन्हा उभारी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला हिंगोली जिल्ह्यात एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे कॉँग्रेसने राजीव सातव यांना राज्यसभेवर पाठवून जिल्ह्यात ताकद देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राजीव सातव यांच्या अकाली निधनाने पुन्हा कॉंग्रेस खिळखिळी झाली होती. जिल्ह्यात काँग्रेसचे नेते असले तरीदेखील एकही खासदार, आमदार किंवा महामंडळावर नेता नसल्याने कार्यकर्त्यांना थेट पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे जावे लागत असे. परंतु पक्षाकडून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर पाठवून जिल्ह्यात काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दरम्यान, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांनी व पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर टाकलेला विश्वास हा सार्थ ठरवून दाखवू. काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून पक्षाचे संघटन बळकट सदैव माझा प्रयत्न राहील अशी प्रतिक्रिया डॉ . प्रज्ञा सातव यांनी दिली आहे.