कार्तिकी एकादशीनिमित्त अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शासकीय पूजा
पंढरपूर : प्रतिनिधी
देशासह जगावरील कोरोनाचे संकट कायमचे दूर व्हावे, तसेच राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट व्हावी, प्रत्येकाच्या घरात धनधान्य, सुख-शांती व समृद्धी नांदावी. सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहण्याची महाराष्ट्राची परंपरा कायम रहावी, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री विठ्ठल चरणी घातले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पवार दांपत्यांचा गहिनीनाथमहाराज औसेकरयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जि. प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सारिका भरणे, मानाचे वारकरी श्री. कोंडीबा देवराव टोणगे, सौ. प्रयागबाई कोंडीबा टोणगे, आमदार समाधान अवताडे, नगराध्यक्षा साधना भोसले आदी उपस्थित होते.
राज्यावर आलेले कोरोनाचे संकट विठ्ठलाच्या आशीर्वादाने कमी होत आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण जगातून कोरोना नाहीसा होवो हीच प्रार्थना विठ्ठलचरणी केल्याचे सांगून अजित पवार म्हणाले, चीन, रशिया व युरोप देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून प्रत्येक नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याचे पाहून सर्व प्रशासकीय नियमाचे पालन करून राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्याचा शासनाने निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीने मंदिर विकासाच्या आराखड्यासह विविध मागण्या केलेल्या आहेत. त्याबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. या वर्षीच्या कार्तिकी वारीस एसटी संपामुळे वारकऱ्यांची संख्या कमी आहे असे नमूद करून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर राज्य शासनाकडून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी मानाचे वारकरी श्री.कोंडीबा टोणगे, सौ. प्रयागबाई कोंडीबा टोणगे(मु. निळा, पो. सोनखेड, ता. लोहा, जि. नांदेड) यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव आदी यावेळी उपस्थित होते.