आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारणकृषि जगतमहानगरेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कल्याण महामंडळास 20 कोटी रुपयांची तरतूद; ही तर सुरुवात; राज्य सरकारचे आभार : धनंजय मुंडे

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी 

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास पहिल्यांदाच 20 कोटी रुपये इतकी आर्थिक तरतूद पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांदरम्यान करण्यात आली आहे. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निधी उपलब्ध करून देण्याबाबतची घोषणा झाली होती.

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या वाटचालीची ही सुरुवात आहे; आणखी खूप कामे करणे बाकी आहे. राज्य सरकारने ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कधीही निधीची कमतरता भासणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. आज प्रथमच महामंडळाला 20 कोटी रुपये आर्थिक तरतूद केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानतो, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे आभार प्रकट केले आहेत.

अनेक वर्षे केवळ कागदावर व घोषणेपूरते मर्यादित राहिलेल्या ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास ना. धनंजय मुंडे यांनी आपल्या खात्याकडे वर्ग करून घेतल्यानंतर या महामंडळास खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.

ऊसतोड कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यादृष्टीने नुकतीच धनंजय मुंडे यांनी संत भागवनबाबा शासकीय वसतिगृह योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेंतर्गत 10 जिल्ह्यातील 41 तालुक्यात 82 वसतिगृहे उभारण्यास व यांपैकी 20 वसतिगृहे याच शैक्षणिक वर्षात उभारण्यास राज्य शासनाने मान्यता प्रदान केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे आता जुलै 2021 या पावसाळी अधिवेशनाच्या सत्रात पुरवणी मागण्यांच्या यादीत या महामंडळास भागभांडवल अंशदान म्हणून 10 कोटी रुपये आणि सहाय्यक अनुदान म्हणून 10 कोटी असे एकूण 20 कोटी रुपये महामंडळ भागभांडवल म्हणून तरतूद करण्यात आली
आहे.

ऊसतोड कामगारांसाठी अनेक नेते पुढे आले, अनेक वर्ष विविध घोषणा झाल्या मात्र त्यांच्या कल्याणासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. धनंजय मुंडे यांनी मात्र सत्तेत आल्यानंतर दीड वर्षांच्या आत ऊसतोड कामगारांच्या बाबत ठोस निर्णय घेऊन महामंडळास मूर्त स्वरूप प्रदान केले आहे. आज या महामंडळास आर्थिक तरतूद प्राप्त झाल्याने या महामंडळाचे भविष्य आशावादी ठरणार आहे!


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us