Site icon Aapli Baramati News

लसीकरण वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन

ह्याचा प्रसार करा
FacebookTwitterLinkedinWhatsappInstagramEmailTelegram

पुणे : प्रतिनिधी

जिल्ह्यात कोविड लसीकरणाच्या शंभर टक्के पहिल्या मात्रा देण्यात आल्या असून दुसरी मात्रादेखील पात्र नागरिकांनी घ्यावी यासाठी जनजागृती करण्यावर भर देणे आवश्यक आहे. नागरिकांना लस घेण्याबाबत प्रोत्साहीत करण्यासाठी कमी लसीकरण झालेल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार  यांनी केले.

विधान भवन येथे आयोजित पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते. बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ओमीक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. या विषाणूपासून संरक्षणासाठी नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. ‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत गेल्या आठवड्यात लशीची दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्या वाढली असून त्यात सातत्य राहील असा प्रयत्न करावा. विशेषत: कमी लसीकरण झालेल्या तालुक्यांवर लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी श्री.राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. महाराष्ट्रात ओमीक्रॉनचा बाधित १० रुग्ण असून त्यापैकी ७ पुणे जिल्ह्यात आहे. हे सर्व रुग्ण लक्षणे विरहीत अथवा कमी लक्षणे असणारे आहेत. जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. मागील १० दिवसात ८ लक्ष लसीकरण करण्यात आले असून त्यापैकी पहिली मात्रा ३३ टक्के तर ६७ टक्के दुसरी मात्रा देण्यात आली आहे. जिल्ह्याने लसीकरणात १ कोटी ३८ लाखाचा टप्पा पार केला असून जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्या १९ हजार १७४ व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत मिळणार आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार त्याबाबत कार्यवाही सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोविड-१९ काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जोग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अशोक नांदापुरकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी धनंजय घाटे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अशोक पवार, आमदार संग्राम थोपटे, आमदार भिमराव तापकीर,आमदार राहूल कूल,आमदार माधुरी मिसाळ, आमदार संजय जगताप,आमदार सुनील शेळके,आमदार चेतन तुपे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे महानगर विकास प्राधिकारणाचे सुहास दिवसे, यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
FacebookTwitterLinkedinWhatsappInstagramEmailTelegram
Exit mobile version