
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आपल्या स्वराने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी आठ वाजता निधन झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण देशभरातून सर्वच क्षेत्रातील व्यक्तींकडून लतादीदींनी श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. लतादीदींच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या दोन दिवशी तिरंगा अर्ध्यावर फडकावला जाणार आहे.
लतादीदींना ८ जानेवारीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाचीही लागण होती. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला व्हेंटिलेटर काढण्यात आले होते. मात्र पुन्हा त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
लतादीदींच्या पार्थिवावर आज संध्याकाळी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात साडेसहा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याअगोदर लतादीदींचे पार्थीव ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून मुंबईतील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव शिवाजी पार्कवर काही काळ दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कवर मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.