
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश लखीमपुर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी देशातील सर्व विरोधी पक्षांनी संयुक्तपणे आवाज उठवण्याची गरज असल्याचे सांगितले होते. त्यांनी कालच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शिवसेनेचे शिष्टमंडळ शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
लखीमपुर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांसह पत्रकाराचा मृत्यू झाला आहे . या घटनेनंतर सर्व विरोधी पक्ष भाजप आणि उत्तर प्रदेश सरकारविरोधात आक्रमक झालेले आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी काल दुपारी राहुल गांधी यांची दिल्ली येथे भेट घेतली. भेटीदरम्यान काय चर्चा झाली हे त्यांनी जाहीर केलेले नाही.
याचदरम्यान, शिवसेना आपले शिष्टमंडळ लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी पाठवणार असल्याची माहिती पुढे येत आहे. काल संजय राऊत यांनी ट्विट करत लखीमपुर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या आंदोलनात झालेली हिंसाचाराची घटना देशाला हादरा सोडवणारी असल्याचे नमूद करत भाजपवर निशाणा साधला होता. तसेच प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने अटक केली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना शेतकऱ्यांना भेटण्यापासून रोखले जात आहे. या दबावशाहीच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत आवाज उठवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले होते.