जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. रोहिणी खडसे या मुक्ताईनगरकडे येत असताना हा हल्ला झाला. त्यामध्ये वाहनाची किरकोळ तोडफोड झाली असून रोहिणी खडसे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रोहिणी खडसे या मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे हळदी समारंभात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. तेथून परतत असताना त्यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला केला. यामध्ये खडसे यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. रात्रीच्या अंधारात हा हल्ला कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दुसरीकडे मागील काही दिवसांपासून मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. अशातच ही घटना घडल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. हा हल्ला कोणी केला याबद्दल अद्याप शोध लागलेला नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या हल्ल्याचा निषेध करत पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्याची मागणी केली आहे.