इंदापूर : प्रतिनिधी
कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याच्या होत असलेल्या निवडणुकीमधून राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतली आहे. या कारखान्यावर कोट्यवधी रुपयांची अनेक कर्जे आहेत. त्यासोबत या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. त्यासोबतच कारखान्याने नवीन सभासद केले नाहीत . त्यामुळे निवडून आलो तरी कारखाना चालवता येणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कारखान्याची निवडणूक लढणार नसल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी जाहीर केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कर्मयोगी कारखाना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आहे. जेव्हापासून कारखाना पाटील यांच्याकडे आहे; तेव्हापासून कारखान्यात सहकार फक्त नावापुरतेच राहिले आहे. कारखान्याच्या नावावर अनेक यंत्रसामुग्री खरेदी करून त्या स्वत:च्या खासगी कारखान्यात बसवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अनेक करार कारखान्याच्या नावावर करून; त्या करारांचा उपयोग आपल्या खासगी कारखान्यासाठी करण्यात आला असल्यामुळे कारखान्यावर मोठे कर्ज झाल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
सभासद व ऊस उत्पादक यांच्यावर अन्याय केला जात आहे. ऊसदर इतर कारखान्यांच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपये टनाला कमी दिला जात आहे. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे तब्बल दहा महिन्यांच्या वेतन थकीत आहे. कारखान्याची परिस्थिती फारच बिकट झाली आहे. कारखान्याने नवीन सभासद नोंदणी केलेली नाही. अशी अनेक कारणे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे.