सांगली : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ‘व्यासपीठावर उपस्थित आजी-माजी एकत्र आलो तर भावी सहकारी’ असे खळबळजनक वक्तव्य केले होते . त्यावेळी व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर आजी-माजी मंत्री उपस्थित होते.या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत पाटील हे शिवसेनेत जाण्याची शक्यता असल्याचा दावा केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांनी केलेल्या ‘आजी माजी एकत्र आलो तर भावी सहकारी असू’ या विधानावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात प्रतिक्रिया उमटत होत्या. जयंत पाटील यांनीही विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात खोचक टोला लगावला आहे. ‘शिवसेनेत काही लोक येण्याची शक्यता आहे . गेल्या दोन दिवसापासून तशी हालचाल होताना मला दिसत आहे . रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत पाटील हे शिवसेनेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. त्यांना सेनेत आल्याशिवाय आजी होता येणार नाही. त्यामुळे हे दोन नेते शिवसेनेत येणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक विधानही त्यांनी केले आहे.
महाविकास आघाडी सरकार भक्कम असून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. दोन वर्षापासून भाजपमधील नेते वेगळे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या अशा वक्तव्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असेही जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.