
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील काँग्रेसला एक नंबरचा पक्ष बनवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र काम करत व जातीय आणि धर्मांध शक्तींविरोधात लढत काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठीच ठराव मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकार्यांची टिळक भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला.
या बैठकीनंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अनेक विषयावर या बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाने त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी केलेले कृषी कायदे जोपर्यंत रद्द होत नाहीत; तोपर्यंत कायदे रद्द करण्यासाठी लढा द्यायचा. त्यासोबत केंद्र सरकारच्या धोरणामुळे वाढती महागाई व बेरोजगारी विरोधात निषेध नोंदवायचा. तसेच राज्यात शक्ती कायदा करायचा, असे अनेक ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले असल्याचे पटोले यांनी सांगितले.
आगामी पालिका निवडणुकीमध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचना पद्धतीचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. परंतु या घेण्यात आलेल्या निर्णयाला काँग्रेसच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या प्रभाग रचनेमध्ये केवळ दोन सदस्य असावेत, अशी भूमिका आहे. या विषयावर बैठकीमध्ये चर्चा झाली असून; या संबंधी एका मताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. या विषयावर आपण लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती करणार आहोत असेही पटोले यांनी सांगितले.