Site icon Aapli Baramati News

राज्यात अद्याप अनलॉक नाही; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन : मुख्यमंत्री निर्णय घेणार

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी 

राज्यातील कोरोना स्थिती बदलत असल्याच्या पार्श्वभूमीवर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उद्यापासून पाच टप्प्यात अनलॉक प्रक्रिया सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत खुलासा करत अद्याप अनलॉकचा निर्णय झाला नसून नव्या नियमांचा प्रस्ताव विचाराधीन असून याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण देताना दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,  कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात  काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत.

 ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन  पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात  या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील, असेही शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून  पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून  याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासन निर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल, असेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version