
मुंबई : प्रतिनिधी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्रात, राजभवनात चांगले रमले आहेत. अनेक कामे करता करता पक्षकार्यही करत आहेत. त्यांनी उत्तराखंडला परत जाऊ नये, अशी आमची इच्छा आहे; पण त्यांना जायचेच असेल, तर १२ आमदारांच्या फाईलवर सही करून जावं, थोडं पुण्य पदरात पडेल, अशा शब्दांत शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
उत्तराखंड राज्याची विधानसभा निवडणूक पुढील काही महिन्यात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोश्यारी यांनी पुन्हा उत्तराखंडात जाऊन पक्षासाठी काम करण्याची इच्छा नेतृत्वाकडे व्यक्त केली असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना राज्यपालांना चिमटे काढले आहेत.
राज्यपाल पुन्हा उत्तराखंडमध्ये जातील का याबाबत अधिकृतपणे काही माहिती नाही. पण त्यांनी चांगले काम केले आहे. राजकारण न करता त्यांनी काम केले असते, तर महाराष्ट्राला त्यांच्या अनुभवाचा फायदा झाला असता. येथील भाजपसोबत त्यांचे चांगले जमले होते; तरीही त्यांना जायचेच असेल तर त्यांनी १२ आमदारांच्या फाईलवर सही करून जावे. तेवढेच पुण्य मिळेल असेही राऊत म्हणाले. महाराष्ट्र आणि त्यांचे अजिबात भांडण नाही. आम्ही त्यांचा आदर करतो, त्यांनीही आमचा आदर करावा, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.