
मुंबई : प्रतिनिधी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनावर जाऊन त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. आज सकाळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री स्वत: राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल झाले.
राजभवनात झालेल्या या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीपूर्वी मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
मागील काही दिवसांत महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या १२ आमदारांच्या प्रस्तावाला राज्यपालांकडून अद्याप मंजूरी मिळालेली नाही. अशाही स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपालांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली. त्यामुळे आता हे ताणलेले संबंध पुन्हा जुळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.