पुणे : प्रतिनिधी
भाजप नेते तथा पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना घरचा आहेर दिला आहे. राजकीय पक्षात मतभेद असतात. पण बोलताना पथ्य पाळलं पाहिजे, अशा शब्दात गिरीश बापट यांनी राणेंना घरचा आहेर दिला.
भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या व्यक्तव्यावरून भाष्य केले. गिरीश बापट म्हणाले, राजकीय पक्षात मतभेद असतात. पण सर्वच पक्षातील नेत्यांनी बोलताना, भाषण करताना काही पथ्य पाळली पाहिजेत. त्यात सर्वच पक्ष आहेत. त्यात मुख्यमंत्री असतील, नारायण राणे असतील यांनी आपआपली मते मांडायला हरकत नाही. पण अनेक गोष्टीत अडचणी दिसतात, मग त्याचं रुपांतर नको त्या गोष्टीत होतं. हे सर्वांनी टाळलं पाहिजे. सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना पाथ्य पाळायला हवं. तसेच सामान्य जनतेला जे आवडतं ते केलं पाहिजे. जनतेत जाऊन कामं केली पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
एक सदस्यीय पद्धतीला बापटांचा विरोध
गिरीश बापट यांनी येत्या महानगरपालिका निवडणुकीत एक सदस्यीय पद्धत राबवण्याला विरोध केला आहे. आम्हाला चार सदस्यीय प्रभाग पद्धती हवी आहे. त्यामुळे एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला आमचा विरोध आहे. हा सगळा राज्य सरकारचा निर्णय असून मंत्रीमंडळ काय निर्णय घेणार त्यानंतर भूमिका स्पष्ट करू असेही गिरीश बापट यांनी म्हटले आहे.