सातारा : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेची घटना कर्मवीर अण्णांनी लिहिलेली आहे. या घटनेनुसार शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे असायला हवे. प्रत्यक्षात या संस्थेचे अध्यक्षपद इतरांकडेच आहे, ते मुख्यमंत्र्यांकडे का नाही, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. उदयनराजे यांनी सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेत शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली.
सातारा ही कर्मभूमी निवडून कर्मवीरअण्णांनी १९१९ मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यावेळी थोरले प्रतापसिंह यांनी अण्णांना सगळ्या प्रकारची मदत पुरवली. यासाठी साताऱ्याच्या राजवाड्यात पुरोगामी विचार घेऊन शाळा सुरू केल्या. यासाठी लागणारे जमिनी वगैरे सगळे सहकार्य केले. रयत शिक्षण संस्थेची घटना स्वतः अण्णांनी लिहिलेली आहे. या घटनेत अण्णांनी संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री असायला हवा असं नमूद केले आहे. मात्र अण्णांच्या विचारांची फारकत घेतली आहे . संस्थेचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असायला हवेत ना? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
आम्ही या संस्थेसाठी बरेच झटलो आहोत. मात्र आमच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीची या संस्थेवर नेमणूक झालेली नसल्याचे अनेकांनी माझ्याकडे बोलून दाखवले आहे. आमच्या राजघराण्याचेही या संस्थेसाठी फार मोठे योगदान आहे. मात्र या संस्थेच्या कामकाजात आम्हालाही सामावून घेतले जात नाही याची खंत असल्याचेही उदयनराजेंनी नमूद केले.
या संस्थेच्या कार्यकारिणीत माझी नेमणूक व्हायला हवी असा अट्टाहास माझा कधीच राहिलेला नाही. या संस्थेच्या निवडणुकीत मला मतदानाचा हक्क सुद्धा नको. मात्र ज्यांनी या संस्थेसाठी आयुष्यभर झटले. त्यांच्यासाठी तरी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. रयत शिक्षण संस्था ही रयतेची आहे. मात्र संस्थेची व्याख्या बदललेली आहे, असेही उदयनराजे यांनी यावेळी सांगितले.