आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारणकृषि जगतपुणेमहानगरेमहाराष्ट्रराजकारण

रणधुमाळी : कर्मयोगीच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष…!

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रात महत्वाचा भाग असलेल्या कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आतापर्यंत या कारखान्यावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची सत्ता राहिली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस काय भूमिका घेणार याकडेच इंदापूरकरांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीने ही निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा सभासद वर्गातून व्यक्त होत आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणुकी कार्यक्रमानुसार  २२ सप्टेंबर पासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तर २४ सप्टेंबर  नामनिर्देशन अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. कारखाना स्थापनेपासून पाटील घराण्याकडे कारखान्याची सत्ता आहे. सहकार महर्षी शंकरराव पाटील यांनी मोठ्या कष्टाने उभा केलेला हा कारखाना सध्या वाईट अवस्थेतुन जात आहे.

कारखान्याची सुरू असलेली अधोगती, शेतकऱ्यांना  वेळेवर न मिळणारी बिले, कामगारांचे थकलेले पगार, सभासद तसेच कामगारांच्या नावावर त्यांना न कळू देता काढलेले कर्ज यामुळे कारखाना कायम नकारात्मक विषयांनी चर्चेत राहिला आहे. इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मागील निवडणुकीत लक्ष न दिल्यामुळे मागील निवडणूक हर्षवर्धन पाटलांसाठी सोप्पी झाली होती. यावेळी मात्र मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करत असलेले दत्तात्रय भरणे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

तालुक्यातील उजनी बॅकवॉटर क्षेत्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीकडे वळलेले आहेत. या शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसने ही निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी राज्यात सत्तेत आहे, कारखाना जर राष्ट्रवादीच्या ताब्यात आला तर कारखान्याची वाढती अधोगती थांबेल. तसेच शेतकऱ्यांची उसाची बिले, कामगारांचे पगार व्यवस्थित होतील अशी आशा शेतकरी आणि कामगार वर्गाला आहे. त्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे कर्मयोगीच्या निवडणुकीला गांभीर्याने घेऊन पॅनल उभा करतात की पुन्हा कारखान्याची सत्ता हर्षवर्धन पाटील यांच्याकडे जाते याकडेच इंदापूरकरांचे लक्ष लागले आहे.  


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Contact Us