मुंबई : प्रतिनिधी
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे येत्या २४ तासात महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात असल्यामुळे राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज सकाळपासून हवामानामध्ये बदल जाणवत असुन पुण्यासह, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, ठाणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील काही तासांत संबंधित जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
दरम्यान, या ठिकाणी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. उद्याही राज्यात पावसाचा जोर असण्याची शक्यता असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच दूरच्या पल्ल्यावर प्रवास करणे टाळण्याचा सल्लाही हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. आज मुंबई, पालघर, बीड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासूनच या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली असून चोवीस तासांत मुंबईत पावसाचे आगमन होईल, असेही सांगण्यात आले आहे.